वाढत चाललेल्या घटस्फोटांना कारणीभूत कोण?


वाढत चाललेल्या घटस्फोटांना कारणीभूत कोण?

हो!!! हा आहे आजचा ज्वलंत व नवीन (विवाह इच्छुक) पिढीला विचार करायला लावणार प्रश्न. नवीन लग्न झालं कि काही महिने होत नाहीत तो पर्यंतच नवविवाहित जोडप्यांच्या जिभेवर अगदी सहज येऊ लागलेला शब्द म्हणजे घटस्फोट. आपल्या विस्कटलेल्या संयुक्त कुटुंब व्यवस्थेचा हा एक वाईट परीणामच म्हणायला काही हरकत नाही.

गेली १० वर्षे वास्तू आणि ज्योतिष सल्लागार म्हणून काम करत असताना मला घटस्फोटाला प्रवृत्त झालेली अनेक जोडपी भेटली, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला घटस्फोटाची जी काही कारणे समजली त्यावरून मला आपल्याच पिढीची कीव वाटू लागली.

बऱ्याच जोडप्यांना घटस्फोटां पासून दूर नेऊन त्यांचा संसार पुन्हा सुखाने आणि योग्य मार्गावर आणल्यानंतर मी या गोष्टीचा विचार केला कि घटस्फोटासारख्या घटनेमुळे एक नाहीतर २ परिवारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टीला जबाबदार तरी कोणाला धरावे?

जबाबदार धरायचे असेल तर त्याची सुरवात होईल आपल्या आजी-आजोबांपासून, त्यांनी जर आपल्या संस्कृतीचे विविध पैलु समजून घेतले असते आणि ते त्यांच्या आणि त्यांच्या पुढील पिढीच्या म्हणजेच आपल्या आई-वडीलांच्या जीवनात उतरवले असते तर आज सर्वांचेच आयुष्य सुखी व समृद्ध झाले असते, कारण तेच संस्कार आणि त्याच संस्कृतीचा वारसा आजच्या पिढीला म्हणजे आपल्याला मिळाला असता.

“सुखी संसाराची गुरु किल्ली” या माझ्या लेखात संयुक्त कुटुंबाचे आजच्या वैवाहिक जीवनातील महत्त्व काय हे सविस्तर मांडले आहे. कारण सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाचे पहिले स्थान आहे ते संयुक्त कुटुंबालाच.

संयुक्त कुटुंबात नवरीमुलगी किंवा नवरामुलगा निवडताना सर्वांचेच मत घेतले जाते आणि सर्व शास्त्रांचा आधार-सल्ला घेऊनच लग्न ठरवली जातात. त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा आधार घेतला जातो तो ज्योतिषशास्त्राचा कारण प्रत्येकाच्या पत्रिकेत त्याचे सर्वांगीण जीवन कसे असेल त्याबद्दल सविस्तर माहिती मांडलेली असते, ते फक्त योग्य व्यक्ती कडून समजून घेऊन त्यावर उपाय करूनच पुढची पाऊले उचलली जायची. ज्योतिषशास्त्र हे कुणाचेच नशीब बदलू शकत नाही पण काही दोष असतील ते समजून घेतल्यानंतर त्यावर उपाय करून त्याची तीव्रता कमी करता येते.

आज संयुक्त कुटुंबच राहिली नाहीत तर संस्कार आणि संस्कृती काय असते हे समजून घेणे तर लांबच राहिले. त्यामुळे ऋषीमुनींनी विचार करून निर्माण केलेल्या शास्त्रांना आणि आपल्या रूढी परंपरांना आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हेच आपण विसरत चाललो आहोत, आणि त्यावर आपला विश्वास तर बिलकुलच राहिला नाही. अंधश्रद्धेच्या नावाखाली आपण आपल्या शास्त्रांनाच तिलांजली देत चाललो आहोत. ज्या शास्त्रांच्या आधारे परदेशातील सुज्ञ नागरीक अभ्यास करून त्याचे अनुकरण करून स्वत:च्या जीवनात अमुलाग्र बदल करून घेत आहेत, काहींनी तर आपल्या शास्त्राच्या शोधांवर जीवनावश्यक गोष्टींचा शोध लावून त्याचे पेटेंट हि घेतलेले आहे.

परंतु आज आपण आपल्या सोईनुसार जसे जमेल तसे, वाटेल तेव्हा आणि कोणाबरोबरही विवाह ठरवत चाललो आहोत त्यामुळे लग्नाच्या काही महिन्यानंतरच काहींना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पती-पत्नीमधील दुराव्याची बरीच कारणे आहेत, ती समजून घ्यायची असल्यास त्यांची राहती वास्तू आणि त्या दोघांची पत्रिका बघावी लागते. आज आपण सर्व प्रथम ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिके मधील कोणते मुख्य घटक असतात जे वैवाहिक सुखात कमतरता आणता ते सर्वांना सोप्या शब्दात समजेल असे बघू.

ज्योतिष शास्त्रानुसार लग्नासाठी पत्रिका जुळवताना मुला-मुलीच्या पत्रिकेतील एकूण ८ गोष्टींचा विचार केला जातो. ते खालीलप्रमाणे.

१) वर्ण २) वश्य ३) तारा ४) योनी ५) ग्रह मैत्री ६) गण ७) भकुट ८) नाडी

१) वर्ण (१ गुण) – वर व वधु यांचे व्यक्तित्व, प्रकृती आणि परंपरा यामधील साम्य दर्शविते.

२) वश्य (२ गुण) – वर व वधु यांमध्ये परस्परांबद्दल किती आकर्षण असेल आणि ते एकमेकांची किती आधिनता स्वीकारतील हे दर्शविते.

३) तारा (३ गुण) – वर व वधु यांचे आयुष्यबळ, लग्न जीवनातील ताळमेळ, वियोग किंवा विरह होईल कि नाही हे दर्शविते.

४) योनी (४ गुण) – वर व वधु यांच्यातील यौन संबंध कसे व किती असतील, एकमेकांना संतोष देऊ शकतील कि नाही. एकमेकांस शाररीक अनुकुलता कशी असेल हे दर्शविते.

५) ग्रह मैत्री (५ गुण) – वर व वधु यांच्यातील मित्रता, शत्रुता किंवा सामान्य मेळ आहे का हे दर्शविते.

६) गण (६ गुण) – वर व वधु यांच्यातील स्वाभाविक, वैचारीक आणि प्राकृतिक मेळ कसा असेल हे दर्शविते.

७) भकुट (७ गुण) – वर व वधु यांच्यातील देणी-घेणी कशी असतील हे दर्शविते.

८) नाडी (८ गुण) – वर व वधु यांच्यातील शाररीक क्षमता (वात, पित्त आणि कफ) आणि त्यांची शाररीक स्थिती दर्शविते. होणाऱ्या संतानाचे आरोग्य कसे असेल आणि ते कधी होईल हे दर्शविते.

वर दिलेल्या ८ गोष्टींना एकूण ३६ गुण असतात त्यामध्ये कोणत्या गोष्टीला किती गुण मिळाले पाहिजे ज्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन सुखकर होते हे प्रत्येक पत्रिकेनुसार वेग वेगळ्या पद्धतीने सांगता येते. आत्ता ठराविक गुण जर कमी-अधिक असतील तर वर-वधु च्या वैवाहिक जीवनात काय परिणाम होऊ शकतो हे खालील उदाहरणा वरून समजून घेऊ.

उदा. वराचा राक्षस गण आणि वधुचा मनुष्य गण असेल (म्हणजे ६ पैकी ० गुण जुळतात) तर दोघांमध्ये टोकाचे वैचारिक मदभेद सतत होत राहतील, त्याच बरोबर जर योनी या स्थानाला ४ पैकी फक्त २ गुण मिळाले असतील तर वर-वधु एकमेकांना यौन सुख पुरेस देऊ शकणार नाही, त्याबद्दल त्यांच्यात दुरावा राहील, त्यातच भर म्हणून प्रीती षडाष्टक योग दोघांच्या पत्रिकेत येत असेल तर या विवाहाला काही अर्थच राहणार नाही. दोघांमध्ये सदैव सर्वांगीण दृष्टीने मतभेद राहतील, एकमेकांचे शाररीक तर नाहीच पण आत्मिक प्रेमही दोघांना मिळणार नाही आणि त्यामुळे सतत वादविवाद होत राहतील. या दोघांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केले नाही तर यांचे नाते नक्कीच घटस्फोटा पर्यंत पोहोचेल परंतु दोघांमध्ये ग्रह्मैत्रीला जर संपूर्ण गुण (५ पैकी ५) मिळाले असतील घटस्फोट नक्कीच होणार नाही, ते दोघेही कसाबसा संसार रेटतील, वैवाहिक जीवनात adjustment करतील परंतु दोघांमधील पती-पत्नीचे नातं हे दुसर्यांना फक्त दाखवण्यासाठीच राहील.

वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल कि दोघांच्या पत्रिकेतील ग्रहमैत्री ला किती महत्त्वाचे स्थान आहे ते. तरी देखील अशावेळी दोघांचे लग्न न जुळवलेलच बरं परंतु जेव्हा वर-वधूची पत्रिका वेगवेगळी बघितली जाते आणि त्यामध्ये जर वर-वधूला वैवाहिक सुख दिसतच नसेल तर त्यावेळी वरील लग्न जुळवायचे कि नाही हे दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून वर-वधूला या सगळ्या गोष्टी समजावून सांगून लग्न जुळवल्यास होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी जाणवेल व नवीन जोडप्यांचे जीवन सुखात जाईल.

साधारणपणे पत्रिका पाहताना खालील गोष्टींना जास्त महत्त्व द्यावे.

१) सर्वात प्रथम एकूण गुण कमीत कमी २५ ते २८ गुणांच्या वरच जुळले पाहिजेत याची काळजी घ्यावी.
२) त्यानंतर दोघांची नाडी एकच तर येत नाही ना हे बघावे कारण नाडी दोष येत असेल तर मुलांच्या जन्माच्या संदर्भात नवीन जोडप्यांना बऱ्याच त्रासांना सामोरे जावे लागते, त्यांना संतान प्राप्ती सहजासहजी होत नाही. प्रेमाचे प्रतिक म्हणून मुलांकडे पाहिले जाते परंतु त्यासाठीच जर त्रास झाला तर नवीन जोडपे सर्वांगीण दृष्टीने खचून जातात.
३) त्यानंतर ग्रहमैत्री आहे कि नाही हे बघावे, ग्रहमैत्री नसेल तर दोघांचे परस्पर जुळणे खूप अवघड जाते, छोट्याशा गोष्टीवरून संसार उद्ध्वस्त होतात.
४) त्यानंतर योनी ला पूर्ण गुण आहेत का नाही ते बघावे कारण वरील दोन गोष्टी आणि योनी या स्थानाला जर पूर्ण गुण मिळत असतील तरी संसार सुखाचा जातो. तसेच जेव्हा नाडी, ग्रहमैत्री आणि योनी या स्थानाला पूर्ण गुण मिळतात तेव्हा सहाजिकच इतर स्थानांनाही चांगलेच गुण मिळालेले असतात. कारण यौनसुख हे आकर्षण नसेल म्हणजे वश्य जुळत नसेल आणि ताराही जुळत नसेल तर पुरेसं लाभत नाही.
५) त्यानंतर भकुट (दोघांमधील कोणत्याही स्वरुपाची देणीघेणी) या स्थानाला किती गुण मिळाले आहेत ते बघावे. या स्थानावरूनच प्रीती षडाष्टक किंवा मृत्यू षडाष्टक आहे का नाही हे समजते. सर्व जुळत असेल आणि या दोघांपैकी एकजरी दोष लागत असेल तरी दोघांचे लग्न न जुळवलेलेच बरे असे माझे वैयक्तिक मत आहे कारण ज्या गोष्टीसाठी आपण लग्न करतो त्याचसाठी आयुष्यभर झुरत बसावे लागणार असेल तर त्या लग्नाचा उपयोग तरी काय? प्रीती षडाष्टक असेल तर दोघेही एकमेकांच्या प्रेमासाठी आयुष्यभर झुरणार आणि मृत्यू षडाष्टक असेल तर दोघांना संसार करताना खूप त्रासाला (मानसिक-शाररीक) सामोरे जावे लागणार.
६) त्यानंतर गण जुळत आहेत कि नाही हे बघावे, कारण दोघांमध्ये वैचारिक, स्वाभाविक आणि प्राकृतिक मेळ नसेल तर कोरोनासारख्या अडीअडचणीच्या वेळेस पतीची पत्नीला किंवा पत्नीची पतीला मदत मिळत नाही.

अशा पद्धतीने पत्रिका बघून लग्न ठरवल्यास बऱ्याच प्रमाणात नवीन जोडप्यांचे वैवाहिक जीवन सुखकर होते. येवढंं मात्र नक्की आहे कि आपण कितीही प्रयत्न केले तरी नशिबात जे आहे तेच होणार परंतु योग्य वेळी आपल्या शास्त्रांचा आधार घेतल्यास येणाऱ्या समस्यांची तीव्रता मात्र कमी करता येते, यातही तेवढेच सत्य आहे.

थोडक्यात काय तर “आज वाढत चाललेल्या घटस्फोटांना आपणच कारणीभूत आहोत”.

या लेखात आपण येथेच थांबूया, नवीन जोडप्यांच्या वैवाहिक जीवनावर त्यांची राहती वास्तू कशी परीणाम करते हे या लेखाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून आपण पुढील भागात बघूया.

लेख आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा घेता येईल आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल.

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment