सुखी संसाराची गुरु किल्ली


पत्नी :- अहो ऐकलंत का, येताना भाज्या आणा आणि हो किराणावाल्याचे पैसेही राहिले आहेत तेही देऊन या. परवा इस्त्रीवाल्याला कपडे दिले होते तुमचे इस्त्री करायला पण त्याने अजून कपडे दिले नाहीत, उद्या तुम्हाला ऑफिसला घालून जाण्यासाठी एकही ड्रेस घरात नाही, नाहीतर ऐनवेळी आकंंड-तांडव कराल, तेव्हा येताना इस्त्रीवाल्याला भेटुन या आणि झाले असतील तर कपडेही घेऊन या. ऐकताय ना? मी काय सांगितले ते.

पती :- हो गंं बाई, अगदी कान देवून ऐकतोय. त्याशिवाय काय करू शकतो. अजून काही राहिलं आहे का सांगायचं.

पत्नी :- अरेच्चा एक सांगायचं विसरलीच की, अहो आज जाधव काकूंच्या नातवाचा वाढदिवस आहे. आपल्याला त्यांनी आवर्जून बोलावलं आहे, जेवण सुद्धा आहे आज त्यांच्याकडे, उगाच फुकटच खावून गेले असे नको वाटून द्यायला, तर मग एक छोटसं आणि छानसं गिफ्टही घेवून या येताना.

पती :- बरं बरं, आणतो. आता एका तासात निघेन ऑफिस मधून, मार्केट मध्ये गेलो की फोन करतो तुला (आणि फोन कट करतो).

पती (स्वता:शी) :- देवा गणपती बाप्पा, किती हा त्रास पुरुषांना, हो हो खासकरून लग्न झालेल्या पुरुषांना. एकीकडे ऑफिसच टेन्शन आणि दुसरीकडे बायकोच की, आज अजुन काय-काय कामे सांगते त्याचं. एक दिवस जात नाही की हि मला ऑफिस मधून येताना काही कामं सांगत नाही. लग्नाला आज बारा वर्षे झाली पण बायकोने कामावरून येताना कधी कामे नाही सांगितली असे झाले नाही. कामे सोडा हो, पण साधं आज तुमचा दिवस कसा गेला असंही कधी तिने विचारलेलं मला आठवत नाही……..

********************************************************************

खरं सांगा, वरील संभाषण वाचताना तुमच्याच अवस्थेच वर्णन तुम्ही वाचत आहात असचं वाटल ना तुम्हाला? अहो असचं वातावरण आज ९९% कुटुंबाच्या घरी आहे याला कारण ऐकच आणि ते म्हणजे आजच्या धावपळीच्या आणि पैसे कमविण्याच्या दुनियेत विस्कळीत झालेली कुटुंब व्यवस्था.

आज पती-पत्नी या नात्यात बार्टर सिस्टम घुसली आहे, प्रेम खूपच कमी आणि व्यवहार जास्त झाला आहे. मुश्किलीने कुठे जास्तीत-जास्त ६ महिने नवीन लग्न झालेली जोडपी प्रेमात आणा-भाका खाताना दिसतात, याच काळात त्यांना एकमेकांच्या डोळ्यात स्वर्ग दिसतो, एकमेकांशिवाय ते एक क्षणही ते दूर राहू शकत नाहीत असे दुसर्यांना दाखवत असतात, आणि ६ महिने झाले रे झाले की मग नवरोबाच्या हातात येते भाजीची पिशवी आणि नवरीच्या हातात येतो भांडी दुण्याचा विम बार. असेच संपतात प्रेमाचे दिवस, आता स्वप्नातून जागे होऊया असे त्यांना वाटायला लागते, नंतर तू कमवून आणि मी घर सांभाळते असा व्यवहार न बोलता चालू होतो ते शेवटंपर्यंत.

जरा १५-२० वर्षे मागे जावून विचार करा, त्यावेळी अशी अवस्था होती का? नाही, कारण त्यावेळी सर्वजण एकाच घरात दाटीवाटीने का होईना पण आनंदाने राहत होते. आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकी, त्यांची मुले, किती मजा यायची ना. प्रत्येक जण आपापल्या कामात हुशार होता, त्यामुळे प्रत्येकाला आपापले कामे करताना मजा यायची. प्रत्येकजण आपपल्या भूमिकेनुसार कामे करायचा, कोणीही कोणाच्या भूमिकेत नाक खुपसायचे नाही त्यामुळे सर्व सुरळीत न चुकता चालायचे. महिला वर्ग घरातील सर्व कामे करायची व पुरुष वर्ग घर चालविण्यासाठी व सर्वांच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कमवून आणायची भूमिका पार पाडायचे, त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाचा मान ठेवायचा, प्रत्येकाबद्दल आदर वाटायचा, प्रेम वाटायचे. अशा वातावरणामुळे घरातील प्रत्येकामध्ये एकमेकांविषयी आत्मीयता असायची, प्रेम असायचे.

शेजारीही तशीच माणसे राहत होती त्यामुळे त्यांच्या घरात काही बनवलं असेल तर ते यांच्या घरी यायचे मग यांनी काही बनवलं की त्यांच्या घरी पाठवायचे, अशीच चुरस स्त्रियांची चालायची आणि पुरुष मंडळी मात्र याची मनमुराद मजा घ्यायची.

संयुक्त कुटुंबात प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त भीती असायची त्यामुळे जे काही पती-पत्नीला प्रेम करायचे आहे ते चार भिंतीच्या आताच असायचे, जगा समोर कमरेत हात घालून, रस्त्याने नाही ते चाळे करत फिरायची काही गरज त्यांना भासायची नाही किंवा तशी हिंमतच व्हायची नाही त्यांची, कारण आई-वडिल व सासू-सासरे यांबद्दल असलेले त्यांचे प्रेम. संयुक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये पती-पत्नी मधील प्रेम अतूट निर्माण होते आणि हेच कारण आहे की जे संयुक्त कुटुंबात राहतात ते सर्वांगीण दृष्टीने खूप प्रगती करतात.

बंधनात जे प्रेम खुलते ते चांगलेच बहरते आणि शेवटपर्यंत टिकून राहते. आजच्या धावपळीच्या व महागाईच्या काळात किंवा बायकोला पटत नाही म्हणून आपण एकत्र राहत नाही किंवा एकत्र राहणे परवडत नाही त्यामुळे आज पती-पत्नीमधील प्रेमलाहि काही सीमा राहिल्या नाही, ना अत्याचाराला. कारण घरात राहतात त्ते हे दोघेच, यांना समजवणार कोण आणि थांबवणार कोण.

संयुक्त कुटुंबात राहत असताना पती-पत्नीला थोर-मोठ्यांची नजर चुकवून चोरून–चोरून प्रेम करावे लागायचे पण वेगळे राहिल्यानंतर कसले आले प्रेम आणि कसली आली आत्मीयता. मनाला वाटेल तेव्हा बेडरूम मध्ये जायचे, थोडक्यात काय तर घर की मुर्गी दाल बराबर किंवा घर का मुर्गा दाल बराबर असचं म्हणावे लागेल. त्या प्रेमात फक्त आणि फक्त वासना राहिली आहे, त्याला प्रेमाचा कुठे लवलेशही राहिला नाही.

लग्न झालेल्या जोडप्यांना पोक्तपणा यायला वेळ लागतो तो पर्यंत जर घरात कोणी थोर मंडळी नसतील तर त्यांच्यात छोट्या-मोठ्या गोष्ठींवरून वाद निर्माण होतात, भांडणे होतात, त्यामुळे संसारातील सामंजस्यपणा निघून जावून कधी-कधी प्रकरण घटस्पोटापर्यंतही जाते. बरीच प्रकरणे असेही बघितले आहेत की पती किंवा पत्नी घरातील वादविवादात आत्महत्याही करतात.

अशा वेळी घरात थोर मंडळी असतील तर अशी अवस्था सर्वप्रथम ते होऊनच देत नाहीत आणि झालीच तर ते सांभाळून घेतात. चार अनुभवाचे बोलहि सांगतात, थोडक्यात आधार देतात.

तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन पिढीवर संस्कार करणे खूप गरजेचे आहे आणि ते फक्त संयुक्त कुटुंबातच शक्य आहे. एकत्र कुटुंबात असताना मुलांना लहानपणा पासूनच इतरांचा-मोठ्यांचा आदर करणे, मोठ्यांचे ऐकणे, आत्मविश्वास, स्वावलंबन, निस्वार्थी प्रेम, नाती, प्रत्येकाचा समाजातील रोल हे सगळेच बऱ्यापैकी कळते. जे आजच्या काळात खूपच गरजेचे आहे.

आज लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहताना तो-ती किती संस्कारी आहेत ते पहिले पाहिले जाते नंतरच पुढे बोलणी सुरु करतात. यावरून तुम्हालाही लक्षात आलेच असेल की संस्काराला किती अनन्य साधारण महत्व आहे ते.

तेव्हा माझा असा अनुभव आहे आणि त्याबरोबर पक्का विश्वास आहे की सुखी संसाराची गुरु किल्ली म्हणजे “संयुक्त कुटुंबच” होय.

वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment